
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षीही सुस्वरे आळवीती…..
संत तुकारामांचे निसर्गाचे वर्णन अद्वितीय आहे, मन शांत करणारे आहे.. त्यातूनही अढळ विठ्ठल भक्ती, नामस्मरणाचा जप यातून त्यांची भावना सहजपणे आणि समर्थपणे शब्दातून प्रकट होते आणि हृदयाला भिडते.
वृक्षवल्ली आणि सोयरी या शब्दांचा अर्थ खूप खोलवर आहे आणि आजच्या काळामध्ये ती समजणे अतिशय आवश्यक आहे.
आज एक मानव जात म्हणून आपण दोन महा समस्यांशी लढा देत आहोत त्या हणजे पर्यावरण संरक्षण आणि सर्वत्र पसरलेली अतिरेकी हिंसा.
त्यापैकी पर्यावरणाचा विचार आपण आजकेवळ माहिती शास्त्र या दृष्टिकोनातून पाहत असतो. किती तापमान वाढल्यावर समुद्राची पातळी किती वाढते, प्रदूषणाचा आकडा किती धोकादायक असतो, एखाद्या प्रकल्पामुळे निसर्गाचा किती विनाश होतो , एखादा आंतरराष्ट्रीय करार किती उपयुक्त आहे …ही ती मांडणी. की बरोबरच असली तरीही अपुरी आहे.
त्याचेच पुढचे टोक म्हणजे किती झाडे कापली तर किती वाहनांचे प्रदूषण कमी होईल, किती झाडांचे पुनर्रोपण करून त्यांचे आयुष्यमान किती वाढेल, गणिताच्या आधारावरती कोर्ट केस कशी जिंकता येईल ही एक बाजू.
त्या विरोधात जनजागृती म्हणून पर्यावरण चळवळ आज जगभर अनेक मार्गाने उभी राहत आहे. त्याचे स्वागत तर आहेच पण तुकारामांचा विचार हा त्याच्या कितीतरी पुढचा आहे. पर्यावरण ही चळवळच नसून ती सोयरीक आहे,
पर्यावरण हे नाते आहे, तो फक्त निसर्गच नसून नैसर्गिक भावना ही आहे. इथेच सोयरीक शब्दालाही तेवढेच महत्त्व आहे.
आपल्यासमोर अति विकासामुळे निर्माण झालेली दुसरी अक्राळ विक्राळ समस्या म्हणजे सर्वत्र पसरलेली आणि कुटुंबातही निर्माण झाली हिंसा. या हिंसेचे स्वरूप केवळ कलह, संपत्ती, अधिकार, एवढे सीमित राहिले नाही. कौटुंबिक हिंसाचार, घटस्फोट याही पलीकडे जाऊन परस्परांवरती अविश्वास, संताप, त्यातून घडणारी अमाननीय कृत्ये आपल्यासमोर विकृत स्वरूपात येत असतात. असुरक्षिततेतून निर्माण होणारी हिंसा ही कोणत्याही मुलाचा मुलीचा, अपंगाचा, व्यक्तीचा, सख्या नात्यांचा नुसताच जीवच घेत नाही पण त्याचं पश्चाताप , दुःख ही भावनाही त्यांच्यात दिसत नाही. याची मानसशास्त्रीय, आर्थिक कारण मीमांसा करण्यापेक्षा आपण प्रेम करायला शिकलो नाही हे खरे कारण आहे.
कावळा चिमणीचा घास, गाईला भरवलेला चारा, तुळशीला केलेला नमस्कार, वटवृक्षाला घातलेली प्रदक्षिणा, नागपंचमी हे केवळ उपचार नसून तो एक निसर्ग संस्कार आहे.
आपल्या नश्वर शरीराचा सृष्टीच्या अनेक रूपांशी असलेल्या नात्याचा – सोयरीचा अनुभव आहे.
म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात अशी सोयरीक साधणे म्हणजे परमेश्वराशी संवाद आहे. निसर्गाचे सानिध्य हा एकांताचा वास आहे, संघर्षापलीकडील – नाही गुणदोष अंगा येत ही मुक्तीची भावना- आहे. आकाश मंडप पृथ्वी आसन सर्व संग परि त्यागाचा विचार हे शाश्वत (sustainable lifestyle) चा पाया आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा अ-भंग विचार तर आहेच , पण पर्यावरण हा केवळ विज्ञानाचाच आणि समाजशास्त्रज्ञाचा भाग नसून विठ्ठल भक्तीचा अध्यात्माचा पाया आहे.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी हा संतांनी शिकवलेला उपयुक्त क्षणांचा आहे.
एका क्षणापुरतं सुद्धा संत तुकारामांच्या अभंगाचे स्मरण आषाढ चा पवित्र महिन्यात झाले तरी आपल्याला नवीन दिशा दाखवण्याचे सामर्थ्य त्यांच्या शिकवणी त आहे..
यावर आपले मत नोंदवा