बिकिनी आणि पडदा
Woman – modern or conservative lifestyle – both are symbols of exploitation
बिकिनी म्हणते फ्रीडम साठी
ठेवते मी कशी झिरो फिगर
मुखवट्याआड डोंगर दुःखाचा
दिसण्यासाठी कॅंडी आणि शुगर
पडदा म्हणतो मी तर गुलाम
शतकां पासूनच वाहते ओझे
नको मला ज्ञानाची लालसा
जरी बंद होतील दरवाजे
पडद्याआडचा पुरुष चलाख
गालातल्या गालात हसत होता
सत्तेच्या नाड्या आवळून दोन्ही
कळसूत्री बाहुल्या नाचवत होता
माणूस तर तू कधीच नव्हतीस
बाई म्हणूनच जगतेस मरतेस
प्रेम विश्वास आदर नकोत नाती
शिकूनही तू तर यंत्रच बनतेस
स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी
आयुष्यभर यातना भोगल्या होत्या
दोघींकडे पाहून स्वर्गात मात्र
सावित्रीबाई पुन्हा रडत होत्या