बाई तुझी किंमत किती….

शहरातल्या फुटपाथ वरून रात्रीच्या वेळी
झोपलेल्या आई बापांच्या कुशीतून
लहानपणीच तुला कोणी पळवले
सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते नाही कळले
कुण्या अज्ञात बाईने तिला कोठे विकले
कोणालाच नाही कुठलीही माहिती
बाई तुझी किंमत किती…..
लहानपणीच शाळेमध्ये एक वाईट अनुभव घेतला
धूस मूस रडत आईच्या कुशीत कसा बसा तो सांगितला
पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली बोलू नकोस
अब्रू ही काचेसारखी तिची मनात बाळग भीती
बाई तुझी किंमत किती….
सरळ मार्गाने मी जाईन मिळेल कुणी राजपुत्र
मनातल्या मनात संसाराचे रेखीटले सुखचित्र
आडवा आला हुंडा बापाला झाले होते
सासू म्हणते चढलीस कशी बोहल्यावरती
बाई तुझी किंमत किती….
झुकारून देऊन करिअरमध्ये घुसले
रॅम्प वॉक शो बिझनेस मध्ये शिरले
कास्टिंग काऊच च्या चक्रात फसले
इथल्या मॅडमने तेच समजावलं
हे सगळं असंच चालतं आम्ही तेच केलं
नसेल जमत हो बाजूला कॉम्पिटिशन आहे मोठी
बाई तुझी किंमत किती…
समाजसेवेसाठी दोन रात्र तू लागलीस
तरीही हैवानी अत्याचाराला बळी पडलीस
स्मशानातील भूते विचकट आवाजात गाणी गाती
पालकांना देऊ पैसे बंद करू त्यांची बोलती
सांग बाई तुझी किंमत किती….
सावित्रीचा यम तिला पुन्हा भेटला
घाबरू नकोस मुली न्याय देईन म्हणला
खोट्या आश्वासनांची तुझ्याकडून तरी अपेक्षा नव्हती
काय न्याय देणार तू असत्यवानांच्या जगात
म्हणे पाठवशील त्या गुन्हेगारांना नरकात
डोळे उघडून जरा बघ
तुझ्या रेड्यांनी पृथ्वीवरच केला नरक
जाऊन विचार ब्रह्मदेवाला
कशाला निर्माण केलीस स्त्री जाती
सांग माझी किंमत किती…
अश्रूना न आवरता बोलला कसा यम
मला समजत नाही तुमचे पृथ्वीवरचे नियम
पोरी तुझ्यासाठी कारण एक गोष्ट फक्त
सात जन्माच्या बंधनातून तुला करेन मुक्त