शनि शिंगणापूर

संत परंपरा घडविते मुक्ताबाई जनाबाई
साज तयावर चढविते चौधरी बहिणाबाई
देवाची द्वारी नसे नरनारी भेदभाव
उभे रहाता क्षणभरी नेत्री दाटावा भक्तिभाव
कुठला शास्त्रार्थ कुठला हा अन्वय
सर्व बाजूंनी ठेवावा विवेक समन्वय
मुंगी उडावी आकाशी तिने गिळावे सूर्याशी
संवाद का खुंटावा केवळ गर्भगृहापाशी
परमेश्वरचरणी दृष्टी असावी निकोप
भगिनींच्या स्पर्शाने कसा होईल प्रकोप
कोण रागिणी वाघिणी कोणाची हो शिकार
त्वेष आवेश आक्रोश चित्ती असती विचार
भेटी लागे जीवा लागावी उरी आस
नको लोळणे रस्त्यावरी नको प्रसिद्धी हव्यास
भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी
देहभान हरपता कोण नर कोण नारी