
बारा किल्ले जागतिक वारसा
तेजस्वी इतिहासाचा हा आरसा
युनेस्को यादीत उमटला ठसा
मराठी साम्राज्याचा ।।
पहिला किल्ला शिवनेरीचा
आशीर्वाद देवी शिवाईचा
पुत्र भाग्यवान जिजाऊ चा
स्वराज्याची शिकवण ।।
अवघड गड हा प्रताप
शिवरायांचे प्रकटे रौद्ररूप
शत्रु मिठीत जाऊन समीप
वाघ नखाने मारिले त्यास ।।
पन्हाळ्याचा वेढा फोडिला
लावून बाजी रक्तात नाहला
शिवबा सुखरूप गडी पोहोचला
खिंड ती झाली पावन ।।
सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी
सुवर्णदुर्ग सागरी किनारी
दूरदृष्टी सामर्थ्य आरमारी
सीमा झाल्या सुरक्षित ।।
अभेद्य जिंजी तो दक्षिणेस
झुंजुनिया शत्रु आला जेरीस
साल्हेर ही लढला तो उत्तरेस
स्वराज्य सीमांचा विस्तार ।।
लोहगडावर स्वराज्यधन
राजगडावरून सूत्रसंचालन
रणनीती आणि नियोजन
स्थापत्यशास्त्रही श्रेष्ठ ।।
रायगडी राज्याभिषेक
ठेचता दुष्टशक्ती किती अनेक
इंग्रजही झाले नतमस्तक
हिंदवी साम्राज्य स्थापन ।।
बारा किल्ल्यांचे करता स्मरण
दिसतील पुन्हा ते सुवर्णक्षण
भारत मातेचे करण्या रक्षण
होईल ती प्रेरणा…।।
Leave a reply to नंदा आचरेकर उत्तर रद्द करा.