
नेहमी खरे बोलावे असं कोणाला जमतं
खऱ्यापलीकडेच आहे खरी आयुष्यात गंमत
कावळा चिमणीची गोष्ट असते हो कुठे खरी
भेटते कुठे आयुष्यात पंख लावूंन सोनपरी
कान्ह्याने पळवले लोणी थोडीच असते चोरी
बाळाचं नटखट रूप असतं आईलाही संमत
खऱ्यापलीकडेच आहे खरी आयुष्यात गंमत
मित्र-मैत्रिणींमध्ये केलीस तू थट्टा मस्करी
लटक्या रागाविना आनंद काय संसारी
कल्पनाच असते यशाची पहिली पायरी
स्वप्नांवरच जगतो माणूस त्याविना नाही करमत
खऱ्यापलीकडेच आहे खरी आयुष्यात गंमत
खोटे कधी बोलावे फक्त दुःखावर फुंकर
भस्म अंगारे लावून नको कुठला चमत्कार
देवळाच्या गाभाऱ्यात नको खोटा नमस्कार
निर्मळ भाव मनी नको कोणाची फसगत
खऱ्यापलीकडेच आहे खरी आयुष्यात गंमत
यावर आपले मत नोंदवा