घडवू अमुचा समर्थ भारत

पहलगामचा प्रतिशोध घेता, शांतिप्रिय नागरिक मनी हसे
घडवू अमुचा समर्थ भारत हीच भावना मनी वसे ॥
असंतुलित अंतर्गत सत्तांभोवती
फिरते पाक आतंकनीती
सारी भारतद्वेषच जपती
छावण्यांसह तयांचे मिटवू ठसे ॥
जवानांत अमुच्या काय उणे
धैर्यापुढे त्यांच्या गगनही ठेंगणे
नका करु असे कोण म्हणे
श्वानांचे भुंकणे गजेंद्राच्या ध्यानी नसे ॥
इतिहासाची तुम्ही चाळा पाने
आक्रमणाची नसती निशाणे
प्रजारक्षणासाठीच लढणे
कुणी आक्रमिता परंतु उत्तर देऊ जशास तसे ॥
कुणी यास युद्धज्वर म्हणतील
शांतिपाठ पढतील, चर्चा झडतील
कलेसाठी अश्रुही ढासळतील
भक्षक रक्षक भेद ह्यांस ठाऊ नसे ॥
सत्यशोधाचा येथे उगम
विविध परंपरांचा तयात संगम
पूज्य येथे बुद्धही गौतम
विश्वशांतिचा खरा उद्घोष असे ॥
Written by: Madhav Kulkarni Source: madhavkblog.in