महाराष्ट्र धर्म वाढवावा

संस्कृतीचे हरण झाले वस्त्र नाही हो अंगात
चर्चा मात्र रंगती आज बिकिनीच्या त्या रंगात
गड किल्ले बुरुज ढासळती भक्ती फक्त घोषणात
सून पोरकी सुभेदाराची आज स्त्री पुन्हा शोषणात
बाजीप्रभू वीर मोठा झुंजला एकटा खिंडीत
विरोधकांवर मारू बाजी गाठू त्यांना कोंडीत
कोंढाण्याच्या आधी व्हावे लग्न फक्त माझ्याच रायबाचे
झुकलेल्या जगाने माना तेथे राज्य आज होयबाचे
शिवरायांचे आठवावे रूप न आठवे प्रताप
साक्षेपापेक्षा आक्षेप मोठा जनतेसं मनस्ताप
मराठा न मिळवावा विभागला तो जातीत
भेदण्या हे दुष्टचक्र पुन्हा जन्मावा शिवबा मातीत