हनुमान चालीसा चा प्रश्न:

करूनिया श्रीरामास नमन , म्हणे परमभक्त हनुमान
मनी माझ्या एक प्रश्न, कृपादृष्टी असावी //
जानकी ही झाली प्रसन्न, म्हणे तू सागर गुणज्ञान
हृदयस्थ तुझ्या नारायण, तुजसी काय शंका //
अचानक रस्त्यारस्त्य़वरी, मंदिरी आणि माध्यमावरी
सारी कशी नर नारी, भजतात आपणासी //
भोगति ते यातना, कष्ट ही साहवेना
भक्त्ति ओसरेना, यंत्रणा होती ठप्प //
कुणी शिवभक्त भाविक , राम लल्ला दर्शनासाठी उत्सुक
हिंदुत्वाचे आम्हीच रक्षक , चढाओढ चालतसे //
ज्यावरून झाले नाव भारत, आपला भ्राता जो भरत
त्यास कोणी नाही स्मरत, प्रभू ही कैसी लीला //
हसून बोलती रघुनंदन, प्रत्येकासी हवे ते सिंहासन
पादुका ठेवूनी विनम्र शासन, कोणास हवे कलियुग //
नको चर्चा तत्वांची, नाही परीक्षा ही स्वत्वाची
वेळ झाली बघ आरतीची, ठेवावी मुद्रा प्रसन्न //