काय घडते महाराष्ट्रात माझ्या:-

काळाच्या पटलावरी, परंपरा श्रेष्ठ लाभली
ती सर्व वाया गेली, या महाराष्ट्रात माझ्या
ज्ञानबा तुकाराम गजर, भक्तीभावाचा विसर
धर्मनिष्ठा भोंग्यावर, या महाराष्ट्रात माझ्या
जिथे स्वराज्याचे तोरण, सन्मानाचे हो रक्षण
त्यांच्याच नावे आरक्षण, या महाराष्ट्रात माझ्या
टिळक आगरकर फुले आणि आंबेडकर
नमस्कार ठरे जातीवर, या महाराष्ट्रात माझ्या
मी पण सावरकर, एक दिवसाची टोपी
हिंदुत्वाची व्याख्या सोपी, या महाराष्ट्रात माझ्या
अफू चरस मद्य, जे जे असे कुख्यात
तरुणाई विळख्यात, या महाराष्ट्रात माझ्या
आरोप चिखल फेक, शिवराळ काथ्याकूट
पक्षा पक्षात फाटाफूट, या महाराष्ट्रात माझ्या
कुठे अस्तनीतले साप , कुठे दाऊदचे हस्तक
झुकविती मस्तक, या महाराष्ट्रात माझ्या
नव्हती श्रींची इच्छा, नाही हे स्वराज्य हिंदवी
राजकारणात हो यादवी , या महाराष्ट्रात माझ्या:-