दोन दिवस दोन ठिकाणी दोन होळीचे नाच पाहिले. आणि लक्षात येण्यासारखा फरक जाणवला. 

एक डान्स शहरातला डीजेच्या तालावर ….

दुसरा नाच कोकणातला भक्तीच्या संगीतावर. …

एक नाच कर्णकर्कश, आजूबाजूची- म्हाताऱ्यांची – रुग्णांची- लहान मुलांची पर्वा ‌न करणारा, मला कायदा शिकवू नका अशी देह बोली, मला काय इतरांचे, मी फक्त बेभान…

दुसऱा नाच तालातला, गावातल्या सगळ्यांना एकत्र बांधणारा, देवीची पालखी डोक्यावर मिरवत भक्ती रसात रंगलेला… शामसुंदर…. अनंत रंगरास रंगणारा….संगीताच्या पावलाप्रमाणे सहज पद लालित्य करत घामाने डबडबत पालखीला सांभाळणारा….. प्रत्येक जण हीच भावना घेऊन देहभान हरपलेला….

एका नाचात अनेक जण सहभागी पण प्रत्येक जण एक एकटा‌ आणि नंतर स्वतःला स्वतःच्या कोषात कोंडून घेणारा ….वेगवेगळ्या कृत्रिम रंगांत आपला चेहरा हरवलेला..

दुसऱ्या नाचात प्रत्येक जण आला वेगळा पण श्री कृष्णाचा प्रेमयोग अनुभवत भक्ती विविध रूपातून प्रकट होते हे सांगणारा… अनेक रंगातून अवघा रंग एकचि करणारा….. जणू रंगी रंगला श्रीरंग….

एका नाचात दुःख दूर करून घटका भराची मौज..

दुसऱ्या नाचात जीवनातल्या सुखदुःखांशी समरस होत नसताना देव मस्तकी धरावा याचे प्रात्यक्षिक….

आपल्या सणांचे महत्त्व खऱ्या अर्थाने जाणून घ्या आणि 

आपले सण जपा….. त्याचे निसर्गाच्या चक्राशी…. कथा आणि परंपरेशी…. आणि दिव्यत्वाच्या प्रतीचीशी….़ … कुठल्याही कष्टाविना कोणत्याही कर्म कांडाविना सहजपणे दैनंदिन जीवनाशी जोडणारे नाते जपा…..

यावर आपले मत नोंदवा

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD