
पाळणाघर ते वृद्धाश्रम उंबरठ्याबाहेरच आहे जीवन
एका घरट्यासाठी सारी आयुष्याचीच आहे वणवण ….
चारा मुखी पिलांच्या आधीच चिमणी जाते उडून
आठवड्यातून कधी एकदा बापाचे होते दर्शन
घरट्यातली ऊब सारी एसी मध्ये जाते गारठून
साऱी सुख लोळती तरी सारखी फक्त होते चणचण
एका घरट्यासाठी सारी आयुष्याचीच आहे वणवण ….
सातच्या आत घरात आज कोणी नाही फिरकत
भिंती आतील कोंडमारा कोणी ढुंकून नाही पहात
शुभंकरोती प्रार्थना स्वर सायंकाळी नाही घुमत
कोपऱ्यात देवघर कुंडीत तहानले तुळशी वृंदावन
एका घरट्यासाठी सारी आयुष्याचीच आहे वणवण …
उंबरठ्यावर माप ओलांडते वधू एक फोटो ऑप
संसारा साठी उरल्या मोबाईलवरच सोपे अँप
आजचे उद्या टिकंना आज, स्वप्नच ठरतो शाप
विश्वचि माझे घर तरी उरी आहे एकटेपण
एका घरट्यासाठी सारी आयुष्याचीच आहे वणवण …
यावर आपले मत नोंदवा