घरटं देता का कुणी घरट
मुक्या पशुपक्ष्यांना कावळा चिमण्यांना
साप-सरड्यांना
कुणी घरटे देतं का घरटं
एका रात्रीत झाडां वाचून
तुटक्या बांध्यामधून
माणसांच्या भावने वाचून
निसर्गाच्या आसर्यावाचून
कोणत्याही गुन्हा वाचून
आपल्या अंड्या पिल्लांना शोधत
आकाशात घिरट्या घालत आहे
जिथे कुऱ्हाड चालणार नाही
अशी जागा धुंडत आहे
कोणी घरटे देता का घरटे
अरे माणसा खरंच सांगतो आम्ही
पंख आमचे थकुन गेलेत
झाडे झुडपे डोंगर कपार्या
अर्धेअधिक तुटून गेल्यात
मडक्यातल्या पाण्यात दगड टाकून
चोची तहानलेल्या सुकून गेल्यात
जळक्या तुटक्या खोडा भवती
खुरटलेल्या बुंध्यांवरती
आशेच्या पालवी शिवाय
उजाडण्या आधीच तडफडतोय
कुठे घरटे देता का घरटे
खरंच सांगतो
निरागसतेला निरागसताच नडते आहे
कावळ्यांना आज पिंडदान नको
पक्षांना पिंजऱ्यातील प्रदर्शन नको
थैली मधले मूठ भरं दाणे ही नको
खरंतर आता घरटेही नको
कावळ्याचं घर होतं शेणाचं
चिमणीचं घर होतं मेणाच
एवढी आठवण निरागस भावविश्वात
बोबड्या बोलात शिल्लक रहावी
क्रूरतेस क्रौर्याची जाणीव व्हावी
तुळशी वृंदावन तरी उभारावे
मागच्या दाराने
त्या कोमजलेल्या निरागसतेसाठी
तेव्हाच बांधू नवी घरटी
रचना : माधव कुलकर्णी
यावर आपले मत नोंदवा