मराठी भाषा ही अभिजात

माय मराठी आमची बोली भाषा ही अभिजात
नवरसांनी नटले वैभव करू तिज प्रणिपात…
संतांची मांदियाळी येथे परमात्म्याशी संवाद
पसायदान मागती विश्वकल्याणाचा आशीर्वाद
अभंग आर्या ओवी भारुड भक्त घालती साद
दिंडी पताका मृदंग नाद विठूरायाच्या गजरात…
जिजाऊच्या मुखे येते महाराष्ट्र अंगाई गीत
पराक्रम गाथा गाती शाहिरांच्या पोवाड्यात
सोनेरी इतिहास वर्णिला इतिहासाच्या बखरीत
राज्यव्यवहारकोश सिंहासनी बैसला थाटात
केसरी गर्जना फटके ग्रंथसंपदा अफाट
निबंध महाकाव्य नाट्यगीत नटसम्राट
गझल लोककला गोंधळ लावणीचा वर थाट
बालगीते बडबड गीते त्यांचा गोड गोंगाट
मूकनायक स्त्री साहित्य आसूड शेतकऱ्यांचा
भ्रमणगाथा चरित्रगाथा वेध कधी निसर्गाचा
कथा कादंबऱ्यासह संस्कार शामच्या आईचा
प्रत्येक वळणावर आयुष्याच्या धरते माय बोट
अनुभूती शब्दबद्ध होता झाली मराठी एक ज्ञानपीठ