मोबाईल हाती धरी

असेल हरी तर देईल खाटेवरी
काही कष्ट नको मोबाईल हाती धरी
गुगल व्हाट्सअप चॅट जी पी टी
अफाट माहिती किती ती महती
ज्ञानगंगा वाहे दारी तीही आयती
सारे काही मिळे हो बसल्या घरी
काही कष्ट नको मोबाईल हाती धरी
युनो कुठे चुकते का रुपया झाला ऱ्हास
दिवाळी काय आहे कशी करावी आरास
प्रेम कसे ओळखावे तेही विना सायास
शब्दांचे बुडबुडे ना कृती खोटी खरी
काही कष्ट नको मोबाईल हाती धरी
ना अनुभूती करुणा ना तपस्या साधना
ना समर्पण सेवाभाव या वेदना संवेदना
उखडली पाळे मुळे नाळ कुठे जुळेना
बधिर वाचा मने बधीर झाली बुद्धी सारी
काही कष्ट नको मोबाईल हाती धरी