स्फुटलेख

बाबासाहेब आंबेडकर आणि समरसता

आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. एक समर्थ, संपन्न ,आपल्या संस्कृतीची नाळ जोडू शकणारे जागतिक पटलावर आपला ठसा उमटवणारे राष्ट्र म्हणून आपण उभे राहत आहोत . अनेक व्यक्ती समूहांनी एकत्र बनलेला भौगोलिक आराखडा एवढीच आपली ओळख नसून एकजिनसी समरस समाज बनवण्याचे स्वप्न आपल्या जडणघडणीचा पाया आहे.

दोनशे वर्षांपूर्वी दीन दुबळा, जाती जातीमध्ये विभागलेला, अज्ञानात  कितपत पडलेला, विज्ञानापासून दूर, शस्त्र हीन, गुलाम देश ही वस्तुस्थिती होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी राजकीय संघर्ष बरोबरच सामाजिक पातळीवर अनेक चळवळी झाल्या. राजा राम मोहन राय, विवेकानंद ,आगरकर, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचार प्रवाहातून सामाजिक उत्क्रांती झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्वतः सामाजिक दुष्परिणामांचे चटके अनुभवले त्यांनी त्यांच्या अनुयायांसह ह्या परिवर्तनाला फार मोठी चालना दिली.

आंबेडकरांच्या कामाचा , व्यक्तिमत्त्वाचा,  व्यासंगाचा आणि कार्याचा प्रभाव खूप व्यापक आणि खोलवर ठरला. आतही त्यांच्या संघर्षाचा काळ मोठा होता. मनुस्मृती दहन , काळाराम सत्याग्रह , धर्मपरिवर्तन हे मोठे संघर्ष त्यांच्या आयुष्यात दिसतात. तात्कालिक सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर हे संघर्ष काळाशी सुसंगत होते . 

तरीही बाबासाहेबांचा खोलवरचा विचार आणि प्रेरणा सामाजिक सौहार्द च्या , समरसतेच्या आणि मानवतेच्या होत्या हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.

नक्षलवाद्यांचा संघर्ष, कमुनिस्ट विचारातील वर्ग संघर्ष, प्रोटेस्टंट चळवळीतील संघर्ष ह्यापेक्षा बाबासाहेबांच्या संघर्षाचा पाया दिशा सकारात्मक, रचनात्मक आणि नवनिर्मितीसाठी होत्या. मनुस्मृतीचा त्याग करताना नवीन राज्यघटना देण्याची विधायक क्षमता त्यांच्याकडे होती. म्हणूनच सूडबुद्धी हा विकाराचा बाबासाहेबांना दुरुनही स्पर्श झाला नाही.

माणसाच्या विचारक्षमते वरती आणि नैसर्गिक सहानुभूती वरती बाबासाहेबांचा विश्वास होता. रक्तरंजित क्रांती हा विचार तर सोडाच परंतु राज्यघटना देताना त्यांनी लोकशाहीची सुंदर व्याख्या केली आहे. ज्या समाजामध्ये रक्ताचा एक थेंबही न सांगता सामाजिक परिवर्तन होते ती खरी लोकशाही अशी विलक्षण, मूलभूत व्याख्या त्यांनी आपल्याला दिली.

 हिंदूधर्मावरील चालीरीतींवर त्यांनी कोरडे ओढले तरीही त्यांचे दुःख वेगळे होते. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी परमेश्वराचा अंश आहे असे म्हणणारी आपली संस्कृती व्यवहारात मात्र दलित शोषित समाजाला माणसाचा ही दर्जा  देत नाही हा विरोधाभास त्यांना खटकत होता. 

व्यक्तिगत अपमान, वेदना बाजूला सारूनही संपूर्ण समाजाचा,  त्यांच्या अनुयायांचा त्यांनी अखंड विचार केला. त्यामागे यांची आध्यात्मिक पातळीवरची बैठक आणि सर्वसमावेशक, समरस समाज निर्माण करण्याची प्रेरणा होती. अस्पृश्यता हा सामाजिक कलंक आहे असे गांधी म्हणत त्यांनाही तुमची सुधारणा म्हणजे केवळ कलंकशोभा आहे का असे निर्भीडपणे त्यांनी विचारले. सावरकरांच्या पतितपावन मंदिर चळवळीला आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या‌ जातीविरहित हिंदू संघटनेला जवळीक साधणारी त्यांची भूमिका होती. 

हिंदू समाजातील परिवर्तनाला लागणारा प्रदीर्घकाळ त्यांच्या काळजीचा विषय होता. इस्लाम आणि ख्रिश्चन ह्यांच्या त्या काळातील विस्तार वादी आणि आक्रमक भूमिकेला बाबासाहेबांनी कडाडून विरोध केला. किंबहुना आपल्या पश्चात आपले लाखो अनुयायी विकृत , अतिरेकी विचारसरणीला बळी पडू नयेत एवढा सखोल विचार त्यांच्या मनात होता.

सर्व धर्मांचा बाबासाहेबांनी सखोल विचार केला आणि सूडाचा मार्ग न स्वीकारता भारतीय संस्कृती मध्ये रुजलेला सामाजिक एकतेचा आणि आध्यात्मिकतेचा समरस विचार त्यांना बुद्धाच्या मांडणीत सापडला.

कम्युनिस्ट, नक्षलवादी ,विस्तारवादी धर्म संघटना, विषमतेने ग्रस्त असलेला हिंदू समाज सर्वांपासून दूरचा मार्ग शोधताना त्यांचा विचार हा भारताविषयी च होता. फ्रेंच राज्यक्रांती विषयी आदर असूनही त्यांचे विचार स्पष्ट होते.

स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे विचार मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतले नसून ते मला माझ्या बुद्धाच्या विचारात दिसतात अशी प्रामाणिक आणि संवेदनशील भावना त्यांच्या धर्म विचारात दिसते.

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या त्यांच्या संदेशातील संघर्ष तात्कालिक अन्याय व्यवस्थेची झगडणारा असला तरीही नवीन समाजरचना त्यांना अभिप्रेत होती.  समता म्हणजे केवळ हक्क पलीकडे समरसता म्हणजे बंधु भावाची , प्रेमाची, सौहार्दाची जाणीव असा अर्थ बाबासाहेबांना अभिप्रेत होता. 

बाबासाहेबांची निर्मिती म्हणजे भारतीय शाश्वत मूल्यांचे काळाशी सुसंगत पुनर्मूल्यमापन होते

पृष्ठे: 1 2 3 4 5 6 7 8 9

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD