पुणे आणि पोर्से ….
पुणे तेथे काय उणे म्हणत होते कुणी गर्वाने
विकासाच्या गंगेत अवैध बार दारू परवाने……
वैभव होते देशाचे कधी एके काळी
इतिहासाच्या पावन पाऊल खुणा स्वातंत्र्याच्या चळवळी
न्यायासाठी लढती नेते साहित्यिकांची मांदियाळी
शुभम करोति कल्याणम लक्ष्मी येते सायंकाळी…
बदलत गेले हळूहळू कोमेजले शहर अवकाळी
कुठले विद्येचे माहेरघर भरला फक्त बाजार
झगमगाट झाला सर्वत्र चेहरा आतला भेसूर
वाटेना झाले काही कृत्य कोणते लाजिरवाणे
विकासाच्या गंगेत अवैध बार दारू परवाने…….
उषःकाल होता होता झाली कधी काळरात
रंगते पार्टी नशेची लक्ष्मीस ही उधळत
विनापरवाना पोर्से धावते दिशाहीन सुसाट
ना बंध कसले मन झाले ते पिसाट
निष्पाप जीवांवर आघात रक्तरंजित पहाट
व्यवस्थाच नासली सारी कसला हा थयथयाट
संवेदनाच झाली नष्ट सारेच केविलवाणे
विकासाच्या गंगेत अवैध बार दारू परवाने…