महात्म्याचा पंचा
महात्म्याचा पंचा:-

एक बॅरिस्टर दक्षिण आफ्रिके मधून भारतात आला. ब्रिटिश
राज्यकर्त्यांचा वरवंटा संपूर्ण भारतभर चालला होता. लुटलेल्या गांजलेल्या लोकांच्या डोळ्यातील दुःख
, मनातील वेदना , आणि आर्थिक दैन्यावस्था त्या बॅरिस्टर ने पाहिली. त्याच्या, समाजाच्या आणि ब्रिटिश सत्तेच्या
संवेदना जागृत करण्यासाठी त्याने आपल्या कपड्यांचा त्याग करून पंचा नेसला.
किरकोळ शरीरयष्टिचा हा महात्मा पंचा नेसून लोकांपर्यंत पोहोचला, गावा गावात फिरला,
ब्रिटिश साम्राज्याच्या महाराणीसमोर तसाच उभा राहिला.
थंडी वाऱ्यात, पावसा पाण्यामध्ये, परदेशी दौऱ्यामध्ये तोच पंचा नेसून त्याने भारताची व्यथा मांडली.
आईन्स्टाईन सारखा सामान्य बुद्धीचा शास्त्रज्ञ थक्क झाला. घराघरांमध्य चरखा फिरू लागला.शिरीष कुमार सारखे कोवळी मुले हुतात्मा झाली.
त्याच निधड्या छातीने त्यांनी दंगलीमध्ये पायपीट केली आणि तिच्यावरच अखेरच्या गोळ्याही झेलल्या.
स्वातंत्र्याची खरी व्याख्या त्या उघड्या शरीराने लोकांना दिली.
उघड्या शरीराचा अर्थही न करण्या इतपत वैचारिक आणि सामाजिक दर्जा घसरलेली काही बॉलिवूडची टाळकी स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचारी वर्तनाशी जोडू लागले.
मी मादी आहे मी नर आहे असे म्हणत समाजावरच तुच्छतेचे चिखल फेकत जन भावनांशी कुठलेही नाते नसलेले बेभान व्यक्ती स्वतःला क्रांतिकारी समजू लागले आहे.
नर आणि नारी पलीकडे आपण माणसेही आहोत हा विचारच विसरल्यासारखा वाटतो.
एका पंचाने दरिद्री माणसाचा दरिद्र नारायण केला
आज नारायणाचा नर करण्याकडे आणि त्याही पुढे पशू करण्याकडे फार थोड्या परंतु कु प्रसिद्ध लोकांवर प्रकाशझोत आहे.
नर नारी नात्याचा निसर्गाने केलेल्या आणि उलगडत जाणाऱ्या विविध सुंदर पदरांचा गंध
नसलेले पशु नैतिकतेच्या गोष्टी शिकवू लागले आहेत.
लज्जा होम समजण्याआधीच लाज संपली. वेदनेचा अर्थ समजण्याआधीच संवेदना संपल्या.
निसर्गाने निर्माण केलेल्या आकर्षणाची ओढच संपली.
लोकसंख्येच्या महा विस्फोटात स्वतःची कोणतीही ओळख टिकवून ठेवण्यासाठी घातक ठरणारी ही चढाओढ , मानवी आकर्षणच नाहीसै करण्यासाठी काम करत निसर्ग संतुलन तर साधत नसेल?
एकदा संवेदना संपल्या की उरते त्याला कलाकार म्हणत नाहीत तर कलेवर म्हणतात.
शत्रूच्या चुकांवर, बाईच्या अब्रूवर , गांजलेल्यांच्या वेदनांवर पांघरूण घालणारा महात्म्याचा पंचा आज बाजारात मिळत नाही. आता पंचाच नव्हे तर आत्माच ठरवला आहे.